प्रतिनिधी : आनंद भालेराव
मुरबाड, दिनांक १ मे — कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरबाड येथे लेबर फ्रंट युनियनच्या वतीने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले व छोट्या व्यावसायिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील बाजारपेठ परिसरात उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर या व्यावसायिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना संरक्षण म्हणून टोपी वाटप करण्यात आले.
उन्हाच्या कडाक्यात रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना या उपक्रमाचा मोठा फायदा झाला असून त्यांनी युनियनच्या या पुढाकाराचे स्वागत केले.
या उपक्रमाचे आयोजन लेबर फ्रंट युनियनचे संस्थापक/अध्यक्ष आयु. श्यामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ॲड. किरण चन्ने यांच्या सूचनेनुसार करण्यात आले. मुरबाड युनिट प्रमुख आयु. रविंद्र चंदने यांनी या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली.
कार्यक्रमास नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आयु. मनोज म्हसे, नगरसेवक आयु. अक्षय रोठे, ॲड. निखिल अहिरे, तालुक्यातील पत्रकार, व्यावसायिक तसेच युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयु. रविंद्र चंदने यांनी मुरबाड बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा संकल्प मांडला. त्यावर मुख्याधिकारी आयु. मनोज म्हसे यांनी लवकरच नगरपंचायतीमार्फत कागदी पिशव्यांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी “लेबर फ्रंट जिंदाबाद” अशा घोषणा देत वातावरण उत्साहपूर्ण करण्यात आले.


Post a Comment
0 Comments