Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथे भव्य मोफत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

 

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : शंकर गायकवाड

ग्रामीण रुग्णालय टोकावडे, ग्रामपंचायत टोकावडे, द्रोणा फाउंडेशन ट्रस्ट, इनरव्हील क्लब ऑफ भिवंडी तसेच रुग्ण कल्याण समिती, ग्रामीण रुग्णालय टोकावडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत शस्त्रक्रिया वैद्यकीय तपासणी व निदान शिबिर शुक्रवार, दि. 24 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात पार पडले.


या शिबिरात दुपारपर्यंत परिसरातील एकूण 487 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यापैकी 72 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी निदान करण्यात आले असून त्यांच्या शस्त्रक्रिया मंगळवार दि. 27 जानेवारी व बुधवार दि. 28 जानेवारी रोजी अनुक्रमे करण्यात येणार आहेत. संबंधित रुग्णांना शिबिरामध्येच शस्त्रक्रियेच्या तारखा देण्यात आल्या.


शिबिरामध्ये डॉ. पिजुष सहा (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. अंकुश पवार (प्लास्टिक व जनरल सर्जन), डॉ. सुनील विश्वकर्मा (अस्थिव्यंग तज्ञ), डॉ. शंकर सुतार (बालरोग तज्ञ), डॉ. पंकज शिगोळे (नेत्रचिकित्सक) आदी तज्ञ डॉक्टरांच्या चमूने रुग्णांची वैद्यकीय तपासणी, निदान, उपचार तसेच सल्लामार्गदर्शन केले.


शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलन करून जनप्रिय जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शिबिरादरम्यान सन्माननीय सुभाष आप्पा घरत, अनिल घरत, संजय दादा पवार, प्रकाश पवार सर, रमेश उघडा, काळुराम घोलप, बंडू दादा पवार यांनी शिबिरास भेट दिली. शिबिरासाठी आवश्यक खुर्च्या व मंडप व्यवस्था श्री. अनिल घरत यांनी प्रायोजित केली, तर वैद्यकीय चमू व कर्मचारी यांच्यासाठी भोजन व्यवस्था श्री. संजय यशवंत पवार व श्री. किशोर राऊत यांनी केली.


प्रास्ताविकात वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मोकाशी यांनी शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, समाजातील दुर्बल तसेच सर्व घटकांतील रुग्णांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार कोणताही खर्च व धावपळ न करता शासकीय रुग्णालयात उपलब्ध व्हावेत, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे. ‘सेवा परमो धर्म’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी अशा शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


तसेच गतवर्षी सुरू करण्यात आलेला शस्त्रक्रिया विभाग व सोनोग्राफी विभाग निरंतर कार्यरत राहील. सन 2026 च्या सुरुवातीलाच आयसीयू सुविधेसह मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग व दंतचिकित्सा विभाग ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


उद्घाटन सत्रास उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी अतिदुर्गम भागात वसलेल्या ग्रामीण रुग्णालय टोकावडेच्या इतिहासात प्रथमच शस्त्रक्रिया व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.


शेवटी, शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध शस्त्रक्रिया सुविधा व लाभांची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करत एकदिवसीय तपासणी शिबिराचा समारोप करण्यात आला.


या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, विभागप्रमुख, अधिपरिचारिका, अधिपरिचारक तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments