Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*मराठी बोलीभाषांच्या जतनासाठी शासनाचा पुढाकार – भाषा संचालक अरुण गिते यांचे प्रतिपादन* *स्व. डॉ. शंकरराव सातव महाविद्यालयात ‘बोलींचा जागर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न*

  


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

 प्रतिनिधी : मोहन दिपके

हिंगोली, दि. 23 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त स्व. डॉ. शंकरराव सातव कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘बोलींचा जागर’ हा विशेष कार्यक्रम गुरुवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. “गोरमाटी लोककला आणि ज्ञानबा-तुकोबा”च्या गजराने संपूर्ण परिसर भारावून गेला. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात दिमाखदार शोभायात्रा व विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालक अरुण गिते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडितराव शिंदे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून एस. के. यादव, भारत जाधव, राहुल सूर्यवंशी व एस. वाय. महाजन उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना भाषा संचालक अरुण गिते म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा या आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. स्थलांतरामुळे अनेक बोलीभाषा लोप पावण्याच्या मार्गावर असून, त्यांच्या जतन व संवर्धनासाठी शासनस्तरावर विशेष उपक्रम, शिबिरे तसेच प्रचार-प्रसाराचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून मानवी संस्कृती आणि सामाजिक जडणघडणीचा मूलभूत आधार आहे, असेही त्यांनी नमूद केले.


प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रतीक्षा तालांगाकर यांनी गोरमाटी भाषेचा ऐतिहासिक प्रवास उलगडून सांगताना, या बोलीभाषेचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करून तिचे लिखित स्वरूपात जतन करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी भाषेतील गोडवा, लोकपरंपरा, रीतिरिवाज व सांस्कृतिक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.

मराठवाडी बोलीचे सौंदर्य विशद करताना शिवाजी अंबुलेकर यांनी अध्यापन प्रक्रियेत बोलीभाषेचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना विषय व कविता अधिक सुलभपणे समजतात, असे उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच प्रा. प्रमोद इंगोले यांनी खानदेशी, अहिराणी व गोरमाटी अशा विविध बोलीभाषांमुळे देशाची सांस्कृतिक समृद्धी कशी वाढते, यावर सविस्तर भाष्य केले.


कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. गोंधळ, वाघ्या–मुरळी नृत्य, गोरमाटी संगीत व नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. बंजारा समाजातील महिलांनी तसेच मसनजोगी समाजातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर केले. कु. लोडू राठोड हिने बंजारा भाषेतील गीतावर सादर केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले.


कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. पंडितराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मी गलांडे यांनी प्रभावीपणे केले.


या कार्यक्रमास सहाय्यक भाषा संचालक शकी यादव, भाषा संचालनालयाचे अनुवादक भारत जाधव, अधीक्षक राहुल सूर्यवंशी, सहायक एस. वाय. महाजन, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, कवी-पत्रकार शिवाजी कऱ्हाळे, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच शहरातील भाषाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments