Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वडनेर-खाकुर्डी प्रकरण: आरोपींना अटक न झाल्यास प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा इशारा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

मालेगाव |प्रतिनिधी-शंकर गायकवाड

मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे मातंग समाजातील कुटुंबावर झालेल्या अमानुष मारहाण, जातीय अपमान व घर जाळपोळ प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते डॉ. अरुण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप केला.


मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता दीपक पानपाटील (मातंग) हे आपले भाऊ सागर व पत्नी पूजा यांच्यासह प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या भरधाव वेगामुळे वाद निर्माण झाला. या वादातून खाकुर्डी गावातील योगेश रावसाहेब ठाकरे, सौरव किशोर ठाकरे व भूषण भाईदास ठाकरे यांनी दीपक पानपाटील व सागर पानपाटील यांना बेदम मारहाण केली. यावेळी दीपक पानपाटील यांच्या पत्नी व भावालाही मारहाण करण्यात आली.


यानंतर ग्रामस्थांच्या मध्यस्थीने तक्रार न करता पीडित कुटुंब घरी परतत असताना रात्री सुमारे ८ वाजता कृष्णा रावसाहेब ठाकरे, लकी ठाकरे, सौरव किशोर ठाकरे, भूषण भाईदास ठाकरे, नितीन ठाकरे, धनंजय राजेंद्र ठाकरे व कुणाल ठाकरे यांनी दीपक पानपाटील यांना जबरदस्तीने न्हावीच्या दुकानात नेले. तेथे जातीवाचक शिवीगाळ करत, त्यांच्या इच्छेविरुद्ध गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दाढी-मिशी काढून जबरदस्तीने मुंडण करण्यात आले.


या घटनेनंतर १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पीडित कुटुंबाची झोपडी जाळून मोठे आर्थिक नुकसान करण्यात आले. ही घटना अत्यंत अमानुष असून माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.


या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल असून न्यायालयाने दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पीडित कुटुंबावर फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असून त्यांना जीवाच्या भीतीत राहावे लागत आहे. राज्याचे कृषिमंत्री यांच्या मतदारसंघात एवढी गंभीर घटना घडूनही त्यांनी अद्याप पीडित कुटुंबाची भेट घेतलेली नाही. आरोपी हे त्यांच्याच पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.


आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनास निवेदन देत इशारा देण्यात आला की, जर तात्काळ आरोपींना अटक करण्यात आली नाही तर दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी कॉलेज रोडवरील पोलिस कवायत मैदानात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमात पीडित कुटुंबासह उपस्थित राहून काळे झेंडे दाखवत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल.


या आंदोलनावेळी मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डिवायएसपी) श्री. बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी पीडित दीपक पानपाटील यांचे कुटुंब, एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार, महासचिव संजय जगताप, उपाध्यक्ष कैलास लोहार, शशिकांत पवार, संदीप महिरे, कुणाल पिंपळे, अमोल मोरे, बापू निकम, गौतम बोरसे, नितीश हिरे, विजय पवार, शुभम म्हसदे, सुनीता महिरे, कपिल पिंपळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments