प्रतिनिधी-शंकर गायकवाड
भिवंडी – हत्तीरोगासारख्या गंभीर आजाराच्या निर्मूलनासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सहा जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमध्ये दिनांक १० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए) राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात करण्यात आला असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोबाईल आरोग्य जनजागृती व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे.
या व्हॅनला मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ही मोहीम जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, ठाणे आणि Godrej Embed – FHI संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी गावडे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधक औषधे सेवन करून घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव तुलनेने अधिक असल्याने ही मोहीम विशेषतः याच तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून तांत्रिक नियोजनाची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांच्याकडे आहे.
![]() |
| जनजागृतीसाठी मोबाईल आरोग्य व्हॅनचा शुभारंभ |
या मोहिमेद्वारे भिवंडी तालुक्यातील एकूण ७ लाख १२ हजार ४९ पात्र लाभार्थ्यांना हत्तीरोगविरोधी औषधे देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातील ५ लाख ८ हजार ७६५ स्थायी लोकसंख्या तसेच २ लाख ३ हजार २८४ स्थलांतरित लोकसंख्येचा समावेश आहे. वीटभट्ट्या, गोदामे, कारखाने, तसेच नवीन बांधकाम ठिकाणी कार्यरत कामगारांना या मोहिमेत प्राधान्य देण्यात येणार आहे.
हत्तीरोग हा संक्रमित डासांच्या चाव्यामुळे पसरणारा गंभीर आजार असून तो दीर्घकालीन अपंगत्व निर्माण करू शकतो. बहुतांश वेळा हा संसर्ग बालवयात होतो, मात्र त्याची लक्षणे प्रौढावस्थेत दिसून येतात. वेळेवर प्रतिबंध न झाल्यास शरीराच्या विविध भागांमध्ये असामान्य सूज येऊ शकते. या आजारावर कायमस्वरूपी उपचार नसून प्रतिबंध हाच प्रभावी उपाय असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
मोहिमेदरम्यान डीईसी व अल्बेंडाझोल ही औषधे एकत्रितपणे दिली जाणार असून यासाठी ५३१ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दोन वर्षांखालील मुले, गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना औषधे दिली जाणार नाहीत. औषधे उपाशीपोटी न घेता आशा सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सेवन करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या औषधांचा उपयोग आतड्यातील जंतुसंसर्ग व त्वचारोगांवरही होतो तसेच मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठीही ती उपयुक्त असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांनी केले आहे.



Post a Comment
0 Comments