कार्यकारी संपादक : रितेश साबळे
वाळूज (छत्रपती संभाजीनगर): वाळूज एमआयडीसी परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल हाताळणे एका तरुणाला महागात पडले आहे. पिस्तूल हाताळताना अचानक गोळी सुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश पवार (वय २३) हा तरुण आपल्या मित्रासोबत असताना आरोपी अझर शफी सय्यद याच्याकडे असलेले गावठी पिस्तूल पाहत होता. यावेळी निष्काळजीपणे पिस्तूल हाताळले जात असताना अचानक गोळी सुटली. ही गोळी थेट महेश पवारच्या उजव्या मांडीत लागल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला.
घटनेनंतर जखमी महेश पवार याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.
पोलिसांनी आरोपी अझर शफी सय्यद याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून विनापरवाना गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.
वाळूज एमआयडीसीसारख्या औद्योगिक व वर्दळीच्या परिसरात बेकायदेशीर शस्त्रांचा वाढता वापर ही गंभीर बाब असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Post a Comment
0 Comments