नवी दिल्ली | प्रतिनिधी-आनंदा भालेराव
महाबोधी महाविहार मुक्ती व बी.टी. ॲक्ट 1949 रद्द करण्याच्या न्याय्य मागणीसाठी सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांची सन्मानपूर्वक भेट घेऊन सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे होणाऱ्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबत या भेटीत सविस्तर माहिती देण्यात आली. महाबोधी महाविहाराशी निगडित बौद्ध समाजाच्या श्रद्धा, भावना, ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच न्याय्य अपेक्षा अत्यंत संवेदनशील व सकारात्मक वातावरणात राहुल गांधी यांच्यासमर मांडण्यात आल्या.
या भेटीच्या वेळी क्रांतिकारी भंते विनाचार्य, रत्नदीपजी रंगारी, अतुल दादा गूढदे, नीरजजी लोनारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संविधानिक मूल्ये, धार्मिक स्वातंत्र्य, लोकशाही मार्गाने प्रश्न सुटण्याची गरज आणि बौद्ध समाजाच्या हक्कांबाबत सखोल चर्चा झाली.
महाबोधी महाविहार हा केवळ धार्मिक स्थळ नसून भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा पवित्र केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्याचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे देणे ही काळाची व न्यायाची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ही भेट केवळ औपचारिक न राहता श्रद्धेचा सन्मान, अस्मितेचा आवाज आणि न्यायाच्या दिशेने टाकलेले ठाम पाऊल ठरली आहे.
महाबोधी महाविहार मुक्तीचा हा संघर्ष शांततेचा असला तरी निर्धाराचा असल्याचा ठाम संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments