नाशिक | प्रतिनिधी-शंकर गायकवाड
कुंभमेळ्यात श्रमदानाच्या बदल्यात विद्यार्थ्यांना श्रेयांक (क्रेडिट्स) देण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्णयाला रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा निर्णय असंविधानिक व भेदभावपूर्ण असल्याचा आरोप करत, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक उपकेंद्राचे सहाय्यक कुलसचिव मा. श्रीपाद बुरकुळे यांची भेट घेऊन जाब विचारला.
विद्यार्थी सेनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात भारतीय संविधानातील कलम २८(१), १४, १५ आणि ५१(अ)(ह) यांचा उल्लेख करत शिक्षण व्यवस्था ही धर्मनिरपेक्ष, समानतेवर आधारित व विवेकनिष्ठ असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. धार्मिक स्वरूपाच्या उपक्रमाशी श्रेयांक जोडणे हे संविधानविरोधी असल्याचा आक्षेप संघटनेने नोंदवला.
हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला.
यावर सहाय्यक कुलसचिव मा. श्रीपाद बुरकुळे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, विद्यापीठाकडून अद्याप कोणतेही अधिकृत परिपत्रक (सर्क्युलर) जारी करण्यात आलेले नाही. मात्र, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने मांडलेल्या निवेदनावर गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांच्या भूमिकेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, स्वयंस्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.


Post a Comment
0 Comments