प्रतिनिधी- मनोहर गायकवाड
नवी दिल्ली : भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या पवित्र महाबोधी महाविहाराचे संपूर्ण प्रशासन बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी येत्या 12 फेब्रुवारी 2026 पासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातून हजारो बौद्ध अनुयायी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देताना आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले की, महाबोधी महाविहार हे जागतिक बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असतानाही तेथे बुद्धांना अपेक्षित स्थान दिले जात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात आपण केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली असून, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही विविध स्तरांवर सरकारकडे हा विषय मांडल्याची माहिती बडोले यांनी दिली.
दरम्यान, बौद्ध भिक्षू संघरत्न भंते यांनी सांगितले की, दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी जागृती यात्रा महाराष्ट्रात काढून बौद्ध समाजात व्यापक जनजागृती करण्यात आली. तसेच 1949 चा बिहार मंदिर व्यवस्थापन कायदा हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा असल्याचे त्यांनी नमूद करत, या कायद्याची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली असल्याचे सांगितले.
महाबोधी येथील बुद्धविहार बुद्धांच्या अनुयायांच्या ताब्यात देण्यास सरकारची अनास्था ही गंभीर बाब असून, “बौद्धांच्या विहारांवर इतर धर्मीयांचे नियंत्रण का?” हा आमचा मूलभूत प्रश्न असल्याचे संघरत्न भंते यांनी ठामपणे सांगितले. याआधी भंते विनयाचार्य यांनी उभारलेल्या आंदोलनादरम्यान त्यांना 68 दिवसांचा कारावास भोगावा लागल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
या ऐतिहासिक आंदोलनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.


Post a Comment
0 Comments