ठाणे | प्रतिनिधी : भिवंडी शहरात शुक्रवारी उशिरा रात्री भीषण दुर्घटना घडली. शहरातील चार मजली निवासी इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून काही नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तसेच टीडीआरएफची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
प्रशासनाने घटनास्थळी अनावश्यक गर्दी टाळण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. बचाव पथकांकडून ढिगारा हटविण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ढिगाऱ्याखाली एका लहान मुलासह आणखी काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने अत्यंत सावधगिरीने शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. संबंधित इमारत महापालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित करून नोटीस बजावली होती. दरम्यान, तळमजल्यावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेत पाच ते सहा जण अडकल्याची शक्यता असून, सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशामक दल आणि टीडीआरएफची पथके अथक प्रयत्न करत असल्याची माहिती आमदार महेश चौघुले यांनी दिली.

Post a Comment
0 Comments