वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
मुंबई- मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. मध्य, पश्चिम, आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते ठाणे या दरम्यान लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबई परिसरात मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. ठाणे, कर्जत, खोपोली आणि कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू आहे." अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या अधिकृत 'एक्स' हँडलवरुन देण्यात आली आहे. दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे चुन्नाभट्टी स्टेशनवर पाणी साचल्यामुळे, कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानच्या हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती आहे.
मागच्या ७२ तासांपासून आभाळ फाटल्यासारखा मुंबई पाऊस सुरू आहे. दादर, माटुंगा, लालबाग परळ, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, ठाणे, मुलुंड, मुंब्रा, कळवा, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अंधेरीमध्ये देखील पाणी साचलं आहे. मुंबईकरांसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे आणि धोक्याचे आहेत. कुणीही घराबाहेर पडू नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अति मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.




Post a Comment
0 Comments