वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खिळे लावल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमुळे वाहनांचे टायर पंक्चर होऊन मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) याबाबत स्पष्ट केले आहे की, हा मुद्दा खिळ्यांशी संबंधित नसून, देखभाल आणि दुरुस्ती दरम्यान वापरण्यात आलेल्या उपकरणांमुळे समस्या निर्माण झाली.
एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये सुमारे 15 मीटर लांब सूक्ष्म तडे आढळून आले होते. त्यावर दुरुस्ती करण्यासाठी ‘इपॉक्सी ग्राउटिंग’ वापरण्यात आले आणि त्यासाठी अॅल्युमिनिअम नोजल्स बसवले गेले होते. हे काम 9 सप्टेंबरच्या रात्री 11.30 वाजता पूर्ण झाले. त्यावेळी वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर काही वाहनचालकांनी हा डायव्हर्जन ओलांडत नोजल्सवरून गाडी चालवली, त्यामुळे तीन वाहनांचे टायर पंक्चर झाले. ही घटना 10 सप्टेंबरच्या रात्री 12.10 वाजता घडल्याचे सांगितले जाते.
घटना समजताच महामार्ग गस्त वाहनाने 12.36 वाजता घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने कोणताही अपघात किंवा जखमींची नोंद झाली नाही. पुढे, सकाळी 5 वाजता नोजल्स काढून टाकण्यात आले आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली.
दरम्यान, डायव्हर्जनदरम्यान आवश्यक सुरक्षा उपाय न केल्याने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे.


Post a Comment
0 Comments