वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड
पालघर (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा कौशल्य आणि परिश्रमाच्या जोरावर राज्याच्या आणि देशाच्या पलीकडे झेप घेतली आहे. गतवर्षी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय रोप स्कीपिंग स्पर्धेत पि. एम. श्री स्कूल – जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियनशिप पटकावली होती.
या उल्लेखनीय यशाची दखल घेत भारतीय रोप स्कीपिंग असोसिएशनने यंदा पुन्हा एकदा या विद्यालयातील सर्व ११ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संघासाठी निवड केली आहे. विशेष म्हणजे, आता या सर्व विद्यार्थ्यांची जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोप स्कीपिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत –
जीत गणेश राऊत, आर्यन वसंत टेंबे, आनंद अंकुश ठाकरे, योगेश सुनील खर्डे, स्वरा निलेश बेंडारी, हर्ष जयदीप ठोकर, तन्मय जयवंत विशे, धीरज जयवंत सातपुते, शंतन महेश जाधव, शिवानी संतोष पागी आणि वैभव तुकाराम रबडे.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य पि. जे. डी. विलियम, शिक्षक संजय साळवे आणि प्रशांत पारगांवकर, सर्व शिक्षकवर्ग, पालक तसेच पी.टी.सी. सदस्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
प्राचार्य विलियम यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या परिश्रम, सातत्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हा मोठा मान शाळेला मिळाला आहे. ही केवळ शाळेची नव्हे, तर संपूर्ण पालघर जिल्ह्याची अभिमानाची गोष्ट आहे.”
जवाहर नवोदय विद्यालय, पालघर येथील हे विद्यार्थी राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करत आता आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकण्याच्या तयारीत आहेत. भारताचा तिरंगा जपानमध्ये फडकवण्याची तयारी पालघरच्या नवोदय विद्यालयाचे शिलेदार जोमाने करत आहेत.


Post a Comment
0 Comments