वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज चव्हाण
जिंतूर (प्रतिनिधी) — मौजे कुऱ्हाडी येथे गेल्या चार दिवसांत पाझर तलावात दोन मुली आणि एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जिंतूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल साहेब तसेच बामणी पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय दर्शन शिंदे साहेब यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.
अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी बुडाल्याची घटना घडली त्या तलाव परिसराची तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या. पाहणी दरम्यान गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तसेच काही ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना महिलांनी कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या जागेची देखील माहिती दिली.
या पाहणीदरम्यान बेनिवाल साहेब व शिंदे साहेब यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तलावाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर “सावधान! येथे पोहणे किंवा धुणे धुण्यासाठी जाण्यास मनाई आहे” असा इशारा देणारा फलक लावण्याचे आदेश दिले. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणीही असे फलक लावून सर्व नागरिकांना सूचना देण्याचे निर्देश पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांना देण्यात आले.
पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांना आवाहन केले आहे की, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तलाव परिसरात पोहण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा खेळण्यासाठी जाण्याचे टाळावे.



Post a Comment
0 Comments