वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मनोहर गायकवाड
तुळजापूर (जि. धाराशिव): श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत असताना, ‘VIP’ दर्शनाचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. स्वतःला भारतीय प्रशासकीय सेवेचा (IAS) अधिकारी असल्याचे भासवून मंदिरात थेट प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तोतयाचा मंदिर सुरक्षा यंत्रणेने पर्दाफाश केला. निखिल मदनलाल परमेश्वरी (रा. अंबड, जि. जालना) असे या तरुणाचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास निखिल परमेश्वरी हा आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात आला होता. भाविकांच्या रांगेत न थांबता थेट ‘VIP’ दर्शन मिळावे, या उद्देशाने त्याने न्हानी गेट परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अधिकाराचा दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
“मी IAS अधिकारी आहे, मला तातडीने आत सोडा,” अशी ठाम मागणी त्याने केली.बनावट ओळखपत्रामुळे संशय
तरुणाच्या अतिआत्मविश्वासपूर्ण वागणुकीमुळे आणि हालचाली संशयास्पद वाटल्याने सुरक्षा निरीक्षकांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. यावेळी त्याने गळ्यात अडकवलेले UPSC चे ओळखपत्र दाखवले. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बारकाईने पाहणी केली असता ओळखपत्राबाबत शंका निर्माण झाली.
अधिक चौकशी सुरू होताच निखिल गोंधळून गेला. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने आपली भूमिका बदलत, “मी सध्या प्रशिक्षणार्थी (Trainee) IAS आहे,” असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (PRO) तांत्रिक तपासणी केली असता संबंधित ओळखपत्र पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आपला मुलगा पकडला गेल्याचे समजताच त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे हात जोडून विनवणी केली. त्यांनी चक्क पोलिसांचे पाय धरून मुलाला सोडून देण्याची मागणी केली. मात्र, मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.
“मी अधिकारी असल्याचे सांगून सरकारी यंत्रणेची दिशाभूल करणे आणि भाविकांच्या श्रद्धेशी खेळणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. मंदिर प्रशासन व सुरक्षा यंत्रणेच्या तत्परतेमुळे हा तोतया वेळेत पकडला गेला,” असे मंदिर प्रशासनाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
सुरक्षा यंत्रणेने निखिल परमेश्वरी याला ताब्यात घेऊन तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले असून, हे कार्ड कोठून आणि कसे तयार करून घेतले, तसेच यापूर्वीही त्याने अशा प्रकारचे गैरप्रकार केले आहेत का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या घटनेमुळे मंदिर परिसरात तोतयागिरी करणाऱ्यांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे.


Post a Comment
0 Comments