प्रतिनिधी - आनंदा भालेराव
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (1991-1992) नागपूर महानगरपालिकेने यशवंत स्टेडियम परिसरातील पटवर्धन मैदान येथे जन्मशताब्दी स्मारक (शोध केंद्र) उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्या वेळी या प्रकल्पासाठी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सध्याच्या घडीला हा खर्च वाढून पाच कोटी रुपयांपर्यंत गेला असतानाही, तब्बल 33 वर्षांनंतरही स्मारकाचे काम सुरू झालेले नाही, अशी तीव्र नाराजी आरपीआय (सेक्युलर) ने व्यक्त केली आहे.
आरपीआय (सेक्युलर) नागपूर शहर व विदर्भ विभागाच्या वतीने अध्यक्ष दिनेश अंडरसहारे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महापौरांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. स्मारक उभारणीसंदर्भात वारंवार धरणे, मोर्चे आणि आंदोलन करूनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या भेटीदरम्यान रत्नमाला गणवीर, निमिषा डोंगरे, संजय आवळे, सचिन वरधे, लालुराम साहु, डॉ. प्रकाश सोनटक्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महापौरांनी संबंधित विषयावर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पंधरा दिवसांच्या आत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जतन व अभ्यासासाठी शोधकेंद्र उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करत, स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी रिपब्लिकन जनतेकडून करण्यात आली आहे.



Post a Comment
0 Comments