![]() |
| प्रा. ग. ह. राठोड सर |
कार्यकारी संपादक रितेश साबळे
औरंगाबाद : गोर समाजामध्ये ‘धर्म’ या संकल्पनेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः व्हॉट्सअॅपवर मोठी चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप कोणाच्याही तर्फे धर्म संकल्पनेवर स्पष्ट आणि सुसंगत मते मांडलेली दिसून आलेली नाहीत. म्हणूनच या संकल्पनेवर विचारमंथन करत काही स्पष्ट मते मांडण्याचा प्रयत्न प्रा. ग.ह. राठोड सर यांनी केला आहे.
प्रा. राठोड यांच्या मते, आर्य ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी म्हणजे प्राचीन भारतात धर्म, जात, संप्रदाय, पंथ, देव-देवी, मूर्तिपूजा, कर्मकांड यांची कोणतीही संकल्पना अस्तित्वात नव्हती. अनार्य, असुर, दैत्य, दानव, राक्षस यांचा उल्लेख वेदांमध्ये केला असला, तरी ते सगळे या तथाकथित धर्म व्यवस्थेपासून मुक्त होते. हे लोक कोणत्याही प्रकारच्या देव-देवतांवर विश्वास ठेवत नसत, त्यामुळे त्यांच्या जीवनपद्धतीमध्ये समता, नैतिकता आणि मानवी सहजीवनाचे मूल्य होते.
राठोड यांचे म्हणणे आहे की, वेदिक कालानंतर ब्राह्मणांनी समाजावर वर्चस्व मिळवण्यासाठी धार्मिक कर्मकांड, जातीय व्यवस्था आणि देव-देवतांची रचना करून संपूर्ण समाजाला गुलामगिरीकडे ढकलले. धर्माचा अर्थ आज चुकीच्या पद्धतीने समजला जात असून विविध धार्मिक संप्रदायांनी द्वेष, विघटन, आणि संघर्ष निर्माण केला आहे.
ते म्हणतात की, खरा धर्म म्हणजे मानवतेवर आधारित नैतिक तत्वे. जिथे समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, सह-अस्तित्व आहे, तिथेच धर्माचा खरा आत्मा जिवंत असतो. आज जे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, जैन, पारसी इत्यादी धर्म म्हणून ओळखले जातात, ते खरेतर धर्म नसून "अधर्म" आहेत, कारण ते परस्परद्वेष आणि तिरस्कार वाढवतात.
संविधान – खऱ्या धर्माचे रूप
राठोड म्हणतात की, आजच्या काळात भारतीय संविधानच एकमेव असा दस्तऐवज आहे, जो नैतिक तत्वांवर आधारित आहे. म्हणून भारतीयांनी संविधानालाच आपला धर्म मानावे. कारण संविधान प्रत्येक माणसाच्या हक्कांचे रक्षण करते. प्राचीन गोर समाज हा नैतिक तत्वांचा पुरस्कर्ता होता. त्यांची जीवनशैली विचारशीलता, मानवता, सर्जनशीलता आणि समतेवर आधारित होती. त्यांच्या या नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना तथागत बुद्धांनी ‘धम्म’च्या माध्यमातून केली.
धर्माची खरी व्याख्या करताना ते म्हणतात – "धारयति इति धर्म:" म्हणजे जो समाजाची धारणा करतो, कल्याण करतो, स्वातंत्र्य, समता आणि न्यायाची जपणूक करतो, तोच धर्म. याउलट जेथे कर्मकांड, देव-देवता, जातीयता, अंधश्रद्धा यांचे प्राबल्य आहे, ती "अधर्म व्यवस्था" आहे.
शेवटी, ते स्पष्ट करतात की देशात नैतिकतेचा आणि सत्य धर्माचा अभाव असल्यामुळे आजचा समाज दहशत, संघर्ष आणि विनाशाच्या मार्गावर आहे. धर्माची पुनर्रचना म्हणजेच नैतिकतेची पुनर्स्थापना हेच काळाचे खरे आव्हान आहे.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर
कार्यकारी संपादक : रितेश साबळे सर
जाहिरातीसाठी संपर्क करा : 88 30 70 85 22


Post a Comment
0 Comments