वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (चिकलठाणा): दिः 31 जुलै 2025 .
चिकलठाणा येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत स्मारकाचे स्थलांतर करण्याचा कट आंबेडकरी जनतेने उघड केला असून, प्रशासनाच्या या विघातक धोरणाविरोधात आज छत्रपती संभाजीनगर महापालिकेसमोर संतप्त धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सदर स्मारक मागील ४२ वर्षांपासून अधिकृत अस्तित्वात असूनही, रस्ता रुंदीकरणाच्या खोट्या कारणावरून त्याचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. ही कृती केवळ अन्यायकारकच नव्हे, तर आंबेडकरी समाजाच्या अस्मितेवर थेट घाव असल्याचा आरोप नेत्यांकडून करण्यात आला आहे.
गुप्त बैठका, समाजद्रोही निर्णय!
स्थानिक आंबेडकरी नेत्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “प्रशासनाने कुठलाही लोकशाही मार्ग न अवलंबता गुप्त बैठका घेऊन समाजाच्या पाठीमागे कट रचला आहे. समाजाच्या भावना, वारसा, आणि संघर्षाची थट्टा करण्यात येत आहे.”
याआधी निवेदनं दिली गेली, मागण्या मांडल्या गेल्या, पण प्रशासनाने सर्व काही डावलून केवळ आदेश लादण्याचा पवित्रा घेतल्याने आंदोलन अनिवार्य झाले आहे.
प्रश्न फक्त स्मारकाचा नाही, ही अस्मितेची लढाई आहे!
मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली बाबासाहेबांचं स्मारक हटवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल आहे – “शेंद्रा-वाळूज मार्गात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक किंवा राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार अडथळा ठरत नाही, मग आंबेडकरांचंच स्मारक का?”
ही सरळ सरळ सामाजिक भेदभावाची नीती असून, शासनाचे दोनहरे धोरण उघड करणारी घटना आहे.
जनतेचा संताप पावसालाही न जुमानता उफाळून आला
पुरुष, महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिकांनी भर पावसात रस्त्यावर उतरत प्रशासनाच्या विरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. ‘स्मारक हटवू नका’, ‘बाबासाहेबांचा अपमान खपवून घेणार नाही’, अशा गर्जना महापालिकेसमोर दुमदुमल्या.
जिल्हाभरातून आंबेडकरी बांधव आंदोलनात सहभागी झाले. हे केवळ एक आंदोलन नव्हे, तर बाबासाहेबांच्या विचारांवरील निष्ठा सिद्ध करणारा ऐतिहासिक क्षण ठरला.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
जाहिरातीसाठी संपर्क करा : 8830708522



Post a Comment
0 Comments