Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

संभाजी कॉलनीत खडी हटविण्याच्या वादातून तरुणाची हत्या.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

रितेश साबळे.

छत्रपती संभाजीनगर : दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संभाजी कॉलनी भागात खडी हटविण्याच्या किरकोळ वादातून प्रमोद पाडसवान (वय ३७) या तरुणाची निर्घृण हत्या झाली. या प्रकरणात सिडको पोलिसांनी ज्ञानेश्वर काशिनाथ निमोने, गौरव काशिनाथ निमोने आणि शशिकला काशिनाथ निमोने (सर्व रा. एन-६, संभाजी कॉलनी) या तिघांना अटक केली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. पन्हाळे यांनी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


खडी हटविण्याच्या कारणावरून वाद


सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद पाडसवान यांचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान (वय ६०, रा. संभाजी कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.४५ वाजता, घरात प्रमोद पाडसवान, त्यांचे वडील रमेश पाडसवान आणि मुलगा रूद्राक्ष असताना शेजारी राहणारे काशिनाथ निमोने, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर निमोने, गौरव निमोने, पत्नी शशिकला तसेच जावई मनोज दानवे यांनी खडी हटविण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली.


वाद वाढताच काशिनाथ निमोने यांनी रमेश पाडसवान यांना धक्काबुक्की केली. याच वादातून ज्ञानेश्वर निमोने यांनी प्रमोद पाडसवान यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी ' केले. या दरम्यान रमेश पाडसवान, रूद्राक्ष पाडसवान आणि मंदाबाई पाडसवान यांच्याही वर वार करण्यात आले. यात प्रमोद पाडसवान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


आरोपींवर कारवाई


घटनेनंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सौरव निमोने, काशिनाथ निमोने आणि मनोज दानवे या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर उर्वरित आरोपी ज्ञानेश्वर, गौरव आणि शशिकला निमोने यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


एसआयटीमार्फत तपास सुरू


या हत्येच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकात पोलिस निरीक्षक संभाजी पवार, शिवचरण पंढरे आणि गजानन कल्याणकर यांचा समावेश आहे. तपासादरम्यान मारेकऱ्याने वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.


या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी पूर्वीच संबंधितांविरोधात वारंवार तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. त्या तक्रारींवर कारवाई का झाली नाही, तसेच घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांची चौकशी एसआयटीमार्फत होण्याची शक्यता आहे.




Post a Comment

0 Comments