वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
संपादकीय
*मुंबई-* राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अधूनमधून हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज रविवारी कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, कोटा, सेओनी, दुर्ग, भवानीपट्टनम, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच उत्तर कोकण आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीमुळे गेल्या काही दिवसांत राज्यात अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, आज (31 ऑगस्ट) रोजी महाराष्ट्रात विविध भागांमध्ये हवामानात लक्षणीय बदल अपेक्षित आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आणि मान्सूनचा प्रभाव कायम असल्याने, राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
कोकण पट्टीत, विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे 31 ऑगस्ट रोजी ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरसह मध्य महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास) आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे.



Post a Comment
0 Comments