Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मराठी तरुण उद्योजकाची अकाली एक्झिट; 'केक वर्ल्ड'चे रोहन म्हात्रे यांचे निधन; अनेक स्वप्नं अधुरी



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

{संपादकीय}

*रायगड-* उरणचे धाडसी युवा उद्योजक रोहन दिलीप म्हात्रे यांचे कॅन्सरने अकाली निधन झाले आहे. उरणमधील प्रभावशाली घराण्यात जन्मलेले रोहन म्हात्रे हे केवळ उद्योजक नव्हते, तर ते स्वप्नाळू आणि धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र ओळखले जात. लहानपणापासूनच हटके विचार आणि वेगळी शैली हे त्यांचे वैशिष्ट्य होते. रोहन यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे.


रोहन म्हात्रे यांच्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात रिअल इस्टेटपासून झाली. द्रोणागिरी प्रकल्पात त्यांनी मॉड्युलर किचन, वाय-फाय अशा त्या काळी अत्यंत दुर्मिळ आधुनिक सोयी दिल्या. प्रकल्प लाँच होताच विकला गेला, मात्र शासकीय अडचणींमुळे त्यांना हा व्यवसाय पटला नाही. त्यानंतर त्यांनी जीवन बदलणारा उपक्रम हाती घेतला तो म्हणजे ‘दी केक वर्ल्ड’. 24 डिसेंबर 2015 रोजी कामोठे येथे पहिलं केक वर्ल्ड हे शॉप सुरु झालं. खेळण्यांच्या दुकानासारखा दिसणारे स्टोअर म्हणजे ‘केकवर्ल्ड’, प्रत्येक केकसोबत छोटे गिफ्ट अशी नवी संकल्पना ग्राहकांना भुरळ घालणारी ठरली. पहिल्या दिवसापासूनच मोठी गर्दी झाली आणि केक वर्ल्डची गरुड झेप सुरू झाली. एका वर्षात 9 शाखा सुरू झाल्या तर 2020 पर्यंत 70 दुकाने व 400 कर्मचारी या परिवारात सामील झाले. 


रोहन यांनी केक वर्ल्डला केवळ दुकान न ठेवता स्टार्टअपसारखे चालवले. रिअल-टाईम सेल्स डेटा, ग्राहकांच्या पसंतीचे विश्लेषण, कर्मचाऱ्यांसाठी परदेशी टूर यांसारख्या योजना त्यांनी राबवल्या. अगदी मर्सिडीज कारमधून केक डिलिव्हरी करण्याचाही त्यांनी विचार केला होता. कोविड-19 महामारीच्या कठीण काळात जेव्हा अनेकांनी खर्च कपात आणि कर्मचारी कपातीचा मार्ग निवडला, तेव्हा रोहन यांनी एकाही कर्मचाऱ्याला कमी केले नाही. पगारही वेळेवर दिले, दुकानांचे भाडेही वेळेवर भरले आणि सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. “आपण अजून तरुण आहोत, विश्वास निर्माण करायचा आहे, ब्रँड उभा करायचा आहे,” अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. 


कोविड-19 च्या काळात त्यांनी नव्या नव्या संकल्पना राबवल्या. मिठाई चेन, बिर्याणी ब्रँड, शाकाहारी रेस्टॉरंट्स, चिप्स-वेफर्स अशा अनेक उपक्रमांच्या योजना त्यांनी आखल्या होत्या. परंतु 2022 मध्ये कॅन्सरचे निदान झाल्यानंतर जीवनाने कठोर वळण घेतले. दोन मोठ्या शस्त्रक्रिया आणि वेदनादायी उपचार सहन करूनही त्यांचा आत्मविश्वास कायम होता. हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांनी आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या निधनानंतर आजही ‘केक वर्ल्ड’च्या माध्यमातून त्यांची स्वप्नं जिवंत आहेत. कर्मचाऱ्यांबद्दलची जबाबदारी, समाजासाठी विचार आणि उद्योजकतेतील धाडसी दृष्टिकोन हीच त्यांची खरी ओळख ठरली.



Post a Comment

0 Comments