Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रिद्धिनाथ बाबा पुण्यतिथी सोहळ्याने भक्तिमय वातावरण भारावले




वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

किन्हवली (संपादकीय) : टाकेश्वर मठाचे अधिपती, ब्रह्मलीन योगी संत रिद्धिनाथ महाराज यांच्या २९व्या पुण्यतिथीनिमित्त खरीड नगरीत शनिवारी (दि. २३) अध्यात्मिक मंगलमय वातावरणात सोहळा पार पडला. वारकरी संप्रदायाचे प्राणस्थान, तर ठाणे जिल्ह्याची प्रतीपंढरी म्हणून ओळख असलेल्या खरीड गावाने या पुण्यतिथीच्या निमित्ताने भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा एक सुंदर संगम अनुभवला.


राज्याच्या कानाकोपऱ्यातून—ठाणे, पालघर, मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, अहिल्यानगर आदी भागातून संत रिद्धिनाथ महाराजांचे हजारो अनुयायी या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दाखल झाले. भक्तांच्या ओढीने खरीड गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.


दोन दिवसीय कार्यक्रमांत नामस्मरणाचा अखंड गजर, जागर भजनातील अध्यात्मिक लय, पहाटेची काकड आरती, पुण्यस्मरणाचा गंभीर स्वर, तसेच पुष्पांजलीचा भक्तिपूर्ण अर्पण अशा विविध धार्मिक उपक्रमांनी वातावरण प्रसन्न व पवित्र झाले. गावभर घुमणाऱ्या ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषाने प्रत्येक भाविकाचे मन भारावून गेले.


या सोहळ्याची सांगता गावातून निघालेल्या पालखी उत्सवाने झाली. गावकऱ्यांच्या सहभागासोबत शेकडो वारकरी, महिला मंडळी व विद्यार्थी यांचा उत्साह या पालखी सोहळ्यात दिसून आला. भक्तांच्या हरिनामाच्या गजरात व टाळ-मृदंगाच्या निनादात खरीड नगरी एक विशाल पंढरपूरच भासत होती.




Post a Comment

0 Comments