वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
अहिल्यानगर : मुंबईत सध्याच्या घडीला मोठ्या घडामोडी सुरु आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावर उपोषण सुरु झालं आहे. हजारो मराठा बांधव आझाद मैदान येथे एकवटले आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. पाऊस पडत असल्यामुळे मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगट रेल्वे स्थानक परिसरात आश्रय घेतला आहे. पावसामुळे आझाद मैदानात चिखल साचलं आहे. दुसरीकडे मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे यांना पोलिसांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आझाद मैदानासाठी परवानगी दिली आहे. यामुळे पुढच्या काही तासांमध्ये काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या टीकेबाबत मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत लक्ष्मण हाके यांना सुनावलं.
राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विमानतळाहून मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. विखे पाटील विशेष विमानाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. त्याआधी त्यांनी शिर्डी विमानतळाबाहेर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी लक्ष्मण हाकेंबाबत विचारलेल्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली.
विखे पाटील काय म्हणाले?
"लक्ष्मण हाकेंचं काही कामच नाहीय. त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयात लुडबुड करण्याची आवश्यकता नाहीय. त्यांना तो अधिकारही नाही. समाजाचे लोकं आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या मांडत आहेत. तर मांडू द्या. त्यांचा तो अधिकार आहे. अन्य समाजाच्या लोकांनी त्यामध्ये हस्तक्षेप का करावा?", असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. "लक्ष्मण हाके यांची जी बेताल वक्तव्ये सुरु आहेत, ते योग्य नाही. त्यांनी ती वक्तव्ये करणं थांबवलं पाहिजेत", असा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
"मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कोणता प्रस्ताव येतोय त्याचा विचार करु. पण उपसमितीची कुठली बैठक ठरलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संध्याकाळी मुंबईत आहेत. त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. पण उपोषणकर्त्यांनी चर्चेसाठी तयारी दर्शवल्याचं माध्यमात पाहिलं. शासनाची आधीपासून तयारी आहे. त्या निमित्ताने मुंबईत प्रत्यक्ष गेल्यावर काय घडतंय, चर्चेत काय ठरतं, त्यावर पुढच्या गोष्टी ठरवू", अशी महत्त्वाची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


Post a Comment
0 Comments