वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मुंबई :मराठी तसेच हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे हिने अनेक मराठी मालिकांसह हिंदी दूरचित्रवाणीवरही संस्मरणीय भूमिका साकारल्या. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत तिने साकारलेली ‘वर्षा’ ही भूमिका घराघरात पोहोचली होती. तसेच साथ निभाना साथिया, बडे अच्छे लगते हैं यांसारख्या मालिकांमधील कामगिरीमुळे तिला विशेष ओळख मिळाली.
मराठीतही ‘या सुखांनो या’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘चार दिवस सासूचे’, अशा मालिकांमधून ती सतत प्रेक्षकांसमोर येत राहिली. नाटक आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत तिने ठसा उमटवला होता.
प्रिया मराठेचा पती अभिनेता शंतनु मोघे आहे. शंतनु यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे हे जोडपं कलाक्षेत्रातील आदर्श आणि आकर्षक जोडपं मानलं जात होतं.
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मराठी अभिनय विश्वाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चाहत्यांबरोबरच सहकलाकारांनीही तिच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Post a Comment
0 Comments