
टिटवाळा पोलिसांनी ऋतिक रोहणे नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
Titwala : सोशल मीडियावरील ओळखी कधी जीवघेण्या ठरतात याचं आणखी एक उदाहरण टिटवाळ्यात समोर आलं आहे. प्रियकराच्या सततच्या धमक्या आणि मानसिक छळाला कंटाळून एका 23 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, तिनं आपल्या प्रियकराशी बोलत असताना व्हिडिओ कॉलवरच गळफास घेतला.
घटनेचा सविस्तर तपशील
कल्याणजवळील टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली. घराच्या टेरेसवर गळफास घेतलेल्या तरुणीला नातेवाईकांनी तातडीने गोवेली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. दुर्दैवाने, शवविच्छेदन न करता थेट अंत्यसंस्कार करण्यात आले.
यानंतर नातेवाईकांनी तिचा मोबाईल तपासला असता, धक्कादायक माहिती समोर आली. इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीमुळे ऋतिक रोहणे नावाच्या तरुणाशी तिची मैत्री झाली होती. हळूहळू त्याने तिच्याकडून दागिने घेतले आणि नंतर ते परत देण्यास टाळाटाळ केली. दागिने मागितल्यावर त्याने तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. तिचे काही खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला सतत त्रास देत होता. या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर तिनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
व्हिडिओ कॉलवर घडली शोकांतिका
आत्महत्येपूर्वी पीडित तरुणीनं ऋतिकशी व्हिडिओ कॉल केला होता. याच संभाषणादरम्यान तिनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे.
इतर मुलींनाही फसवणुकीची भीती
या घटनेनंतर पीडित तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप करत सांगितलं की, आरोपी ऋतिक रोहणेने अशा पद्धतीने अनेक तरुणींना फसवलं आहे. त्यांच्या मुलीच्या बाबतीत घडलेलं इतर कोणाबरोबर घडू नये म्हणून त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी ऋतिक रोहणेला ताब्यात घेतलं असून, त्याने किती मुलींना अशा प्रकारे फसवलं आहे याचा सखोल तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments