वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर- केदारनाथ यात्रेला गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाच्या अंगावर दरड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना केदारनाथ येथे शनिवारी केदारनाथ येथील गौरीकुंडाहून एक किलोमीटर उंचीवर असलेल्या ठिकाणी उघडकीस आली. घटनेची माहिती इंजिनिअर तरुणाच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून तरुणाचा मोठा भाऊ विमानाने केदारनाथ येथे दाखल झाला आहे. या घटनेमुळे वाळूज भागात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
परमेश्वर खवल (रा. साईबन हाऊसिंग सोसायटी वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर) असं मृत झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी आठ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील वडगाव कोल्हाटी येथे रो हाऊस घेतला आहे. मात्र ते पडेगाव भागातील तारांगण येथे पत्नी, दोन मुली व आठ महिन्याच्या मुलासह राहतात. परमेश्वर यांना त्यांच्या आई-वडिलांना केदारनाथ येथे घेऊन जाण्याची इच्छा होती, मात्र आई-वडिलांचं वय अधिक असल्यामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे ते स्वतः केदारनाथकडे रवाना झाले.
दरम्यान केदारनाथ येथील गौरीकुंडाकडून सुमारे एक किलोमीटर उंचीवर पायी जात असताना अचानक डोंगरातील एक भाग कोसळला. यामध्ये परमेश्वर हे दबले होते. स्थानिक यंत्रणांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती तात्काळ वाळुज एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी माहिती घेतली असता वृद्ध आई-वडील घरी होते. दोन चिमुकल्या मुली शाळेत गेल्या होत्या, तर पत्नी रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. मुलींना विचारून परमेश्वर यांचा मोबाईल अनलॉक करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच परमेश्वर यांचे मोठे भाऊ तात्काळ विमानाने केदारनाथकडे रवाना झाले आहेत. या घटनेची माहिती वाळुज वडगाव भागामध्ये वाऱ्यासारखी पसरली. दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.



Post a Comment
0 Comments