वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कल्याण (संपादकीय):
कल्याणमधील रस्त्यांवरील खड्ड्यांनी आणखी एक जीव घेतला आहे. या अपघातात प्राण गमावणारा तरुण म्हणजे रोहन शिंगरे. रोहन हा शिवसेना (शिंदे गट) मधील ज्येष्ठ कार्यकर्त्याचा एकुलता एक मुलगा होता.
23 जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे वाशी येथील नोकरीवर जाताना कल्याण-शीळ मार्गावरील पिंपळेश्वर हॉटेलजवळ त्याची बाईक खड्ड्यात आदळली. त्याचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला आणि मागून येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले. यात त्याचा हात गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला प्रथम गजानन हॉस्पिटल आणि नंतर वाशीतील महात्मा फुले ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हात कापावा लागला, तब्येत सुधारत होती, पण अचानक प्रकृती बिघडली आणि 15 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रोहन कल्याण पश्चिमेतील आरती सोसायटीत राहत होता. गेल्या चार वर्षांपासून तो बाईकने वाशी येथे नोकरीसाठी प्रवास करीत असे. घरातील एकुलता एक मुलगा असलेल्या रोहनच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुढील वर्षी त्याचे लग्न करण्याचा विचार घरच्यांनी केला होता.
बहिणी रिद्धी शिंगरे हिने भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले – “खड्ड्यामुळे माझ्या भावाचा जीव गेला. आता आणखी कोणाचं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ नये. प्रशासनाने वेळेत पावले उचलली पाहिजेत.”
माजी महापौर वैजयंती घोलप गुजर यांनीही प्रशासनावर टीका करताना म्हटलं की – “पावसाळ्यात पाण्याखाली खड्डे दिसतच नाहीत, त्यामुळे अपघात होतात. पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजवले गेले पाहिजेत.”
स्थानिक नागरिकांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “प्रत्येक वेळी अपघात घडतो, सरकार फक्त शोक व्यक्त करते, पण ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. रोड टॅक्स घेतला जातो, पण जनतेला सुरक्षित रस्ते दिले जात नाहीत. आता तरी शासनाने जबाबदारी घेतली पाहिजे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.”


Post a Comment
0 Comments