Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण; गवईंचे जोरदार भाषण; काय ती झाडी-काय ते डोंगर' डायलॉगचीही झाली आठवण.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

{संपादकीय}

कोल्हापूर-गेल्या अनेक वर्षांपासून सर्किट बेंचसाठी सुरू असलेला कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा लढा अखेर संपुष्टात आला. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. शाहूनगरीत होत असलेला सोहळा, कोल्हापूररांकडून झालेले आदरातिथ्य आणि शाहू छत्रपती-बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेमपूर्वक संबंधांचा उल्लेख सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात केलाच परंतु सर्किट बेंचसाठी सुरू असलेल्या संघर्ष काळात महाराष्ट्रातील नेत्यांचा 'गुवाहाटी दौरा' सुरू होता, अशी टिप्पणी त्यांनी केली. यादरम्यान चर्चेत असलेला 'काय ती झाडी-काय ते डोंगर' अशा संवादाचा उल्लेखही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात केल्याने मंचावर उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हसू अनावर झाले.


कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे, शाहूनगरीचे खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह ६ जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे यासाठी लढा सुरू होता. अखेर याला यश मिळाल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या सहा जिल्ह्यातील जवळपास ७० हजार प्रकरणे आता खंडपीठामध्ये चालवली जाणार आहेत.


विवेक घाडगे पाटील, संग्राम देसाई मला आग्रह करायचे की कोल्हापुरात कार्यक्रमासाठी या. मुंबईत बार काऊन्सिल ऑफ इंडियाची परिषद होती. त्या परिषदेत विवेक घाडगे पाटील यांचे भाषण ऐकले. कोल्हापूरबद्दल ते भरभरून बोलत होते. अगदी त्याच वेळी महाराष्ट्रातील नेत्यांचा गुवाहाटी दौरा सुरू होता. घाडगे पाटलांचे भाषण ऐकून काय ते झाडी.. काय ते डोंगर... असा संवाद मला आठवला, असे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. कोल्हापूरच्या कार्यक्रमासाठी मला अनेकदा बोलवणे आले परंतु मी ठरवले होते की कोल्हापूरला येईल तर नियतीने साथ दिली तर १४ मे २०२५ नंतरच येईल आणि सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठीच येईल... असे सरन्यायाधीश गवई म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. आपल्याला मिळालेला अधिकार हा राजवैभव, राजविलास उपभोग घेण्यासाठी नसून आपल्या रंजलेल्या गांजलेल्या प्रजेसाठी आहे, असे शाहू महाराजांनी सांगितले होते. त्यांच्या या वाक्याचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. 


पद हे अधिकार गाजविण्यासाठी नाही, नियतीने सेवा करण्याची दिलेली संधी आहे, त्यानुसार मी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, असे सरन्यायाधीशांनी आदरपूर्वक स्पष्ट केले. तसेच त्यांचे सर्वोच्च न्यायालयातील सहकारी समरेंद्र निंबाळकर यांनी शाहू महाराज यांच्यावर केलेली खास कविताही ऐकवली. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात शाहू महाराज यांचे अमूलाग्र स्थान राहिले. लंडनमधून अर्धवट शिक्षण सोडून आलेल्या बाबासाहेबांना शाहू महाराजांनी आर्थिक मदत करून पुन्हा लंडनला पाठवले. त्याचवेळी 'बाबासाहेबांनी द प्रोब्लेम ऑफ रुपी' हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला ज्यावर आपली अर्थव्यवस्था उभी आहे, असा विशेष उल्लेख सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचे स्मारकात रुपांतर केले. मी तिथे दोन तीन वेळा जाऊन आलो. तसेच शाहू महाराजांचे हस्ताक्षर असलेले डॉ. आंबेकरांना लिहिलेले पत्र लंडनच्या स्मारकात आहे, अशी विशेष आठवणही सरन्यायाधीश गवई यांनी सांगितली.



Post a Comment

0 Comments