वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
संपादकीय
पुणे / औरंगाबाद – औरंगाबाद येथील विवाहित महिलेने पतीच्या अत्याचाराला कंटाळून पुणे गाठले. पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी तिची धैर्याने मदत केली. तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल करून स्वावलंबी जीवनासाठी मार्गदर्शन केले. मात्र, तिच्या या मदतीला तिच्या नातेवाईकांकडूनच अडथळा आणण्यात आला. या नातेवाईकांपैकी एक निवृत्त पोलीस अधिकारी असून त्यांनी आपल्या पदाचा वापर करून पुणे पोलिसांची मदत घेतल्याचा आरोप आहे.
या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही वॉरंट नसताना रात्रीच्या वेळी संबंधित तिघी सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेले. विशेष म्हणजे या महिलांना जातीय व स्त्रीद्वेषी शिवीगाळ करण्यात आली. या प्रकारानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी करण्यात आली, मात्र पुणे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सुजाता आंबेडकर यांनी थेट पोलिस आयुक्तालयात धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी ठामपणे जाहीर केले की, “जोपर्यंत या प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही आयुक्तालय सोडणार नाही!”
सुजाता आंबेडकर यांनी पोलिस प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “संज्ञेय गुन्ह्यांची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यावर एफआयआर नोंदवणे कायद्याने बंधनकारक आहे. पोलिसांनी कायद्याचा आदर केला पाहिजे; कारण कायदा म्हणजे कायदाच असतो!”
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा समितीने देखील या प्रकरणात आंदोलक भूमिका घेतली असून, जर पोलिसांनी तात्काळ एफआयआर दाखल केला नाही, तर मोठ्या प्रमाणात एसपी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.



Post a Comment
0 Comments