कार्यकारी संपादक : रितेश साबळे .
पुणे दिः 3 ऑगस्ट 2025 :- कोथरूड येथील पोलिस ठाण्यात दलित समाजातील तिन्ही तरुणींना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवून मानसिक छळ, जातिवाचक शिवीगाळ, लैंगिक अवमान आणि शारीरिक दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलींनी थेट पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन न्यायासाठी आवाज उठवत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांवर आणि व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितांपैकी एक विवाहित तरुणी सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून पुण्यातील कोथरूड येथील मैत्रिणीच्या घरी आली होती. मात्र, संबंधित प्रकरणात पोलीस चौकशीच्या नावाखाली तिन्ही तरुणींना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेऊन, १२ तासांहून अधिक काळ अटक करून ठेवले, असा आरोप आहे.
या दरम्यान महिला PSIसह काही पोलिसांनी पीडित मुलींना “लेस्बियन, प्रॉस्टिट्यूट, भटक्या जातीतल्या” अशा अपमानास्पद व जातिवाचक शब्दांनी हिणवले, असे पीडितांनी स्पष्ट केले. पीडितांप्रमाणे पोलिसांनी त्यांच्यावर शारीरिक दमदाटी, मानसिक छळ केला आणि मोबाईल हिसकावून घेतले.
या घटनेमुळे पुणे आयुक्तालयासमोर रविवार पहाटेपर्यंत आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांनी थेट हस्तक्षेप करत पीडित मुलींना भेट दिली व तात्काळ कारवाईची मागणी केली.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही घटनेची गंभीर दखल घेत पीडित मुलींशी संपर्क साधला असून, दोषी पोलिसांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी “तपास सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे सांगितले आहे.
सद्यस्थितीत आरोपी पोलीस अधिकारी सेवा पदावरच कार्यरत असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे पीडित मुलींना न्याय मिळेल का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
घटनेचे ठळक मुद्दे:
ठिकाण: कोथरूड पोलिस स्टेशन, पुणे
पीडित: तीन दलित तरुणी
आरोप: बेकायदेशीर ताबा, जातिवाचक शिवीगाळ, मानसिक छळ, लैंगिक अपमान
कारवाईची स्थिती: गुन्हा अद्याप दाखल नाही
हस्तक्षेप: वंचित बहुजन आघाडी, महिला आयोग




Post a Comment
0 Comments