वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
औरंगाबाद – गोर बंजारा समाजाच्या वाड्या-वस्त्यांचे संघ, भाजप आणि ब्राह्मणवादी शक्तींकडून ब्राह्मणीकरण, भगवीकरण आणि संघीकरण करण्याचा एक संगनमताने प्रयत्न सुरू असून, हे एक मोठे कारस्थान असल्याचा गंभीर आरोप प्रा. ग.ह. राठोड यांनी केला आहे.
प्रा. राठोड म्हणाले की, गोर बंजारा समाज हा वर्णबाह्य, आदिवासी, भारताचा मूळनिवासी समाज आहे. तो कधीच हिंदू अथवा ब्राह्मणी संस्कृतीचा भाग नव्हता, आणि आजही नाही. मात्र ब्राह्मण, भट, पुरोहित, आणि त्यांच्या ग्रंथांचा प्रचार समाजात करून, बंजारा समाज हिंदू आहे, असा अपप्रचार काही दलाल, साधू, महाराज, संत आणि प्रवचनकार करत आहेत.
त्यामुळे समाजात भ्रम निर्माण झाला असून, अनेक सरकारी अभिलेखांमध्येही गोर बंजारा समाजाला हिंदू दाखवले गेले आहे. हा अपप्रचार थांबवण्यासाठी समाजाने जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रा. राठोड यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, गोर बंजारा समाज मूर्तीपूजक नव्हता, तर निसर्ग, पाळीव पशु, वृक्षवल्ली आणि पूर्वजांचा वंदक होता. समाजात कोणतीही मंदिरे वा तीर्थक्षेत्र नव्हती. मात्र पेशवाईपासून सुरू झालेला भटांचा व संघप्रणीत दलालांचा हस्तक्षेप आज अधिकच वाढत असून, मंदिरं, तीर्थक्षेत्रं आणि मेळावे यांच्या माध्यमातून समाजाचं ब्राह्मणीकरण आणि भगवीकरण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
विशेषतः पोहरादेवी येथील संत-महंतांचे मंडळ, गोद्री मेळाव्याचे आयोजक, आणि तथाकथित गोर बंजारा हिंदू धर्मपीठ यांचा या प्रक्रियेत मोठा सहभाग असून, हे सर्व संघाशी हातमिळवणी करून समाजाला दिशाभूल करत आहेत, असा दावा त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर प्रा. राठोड यांनी गोर बंजारा समाजातील सर्व विज्ञानवादी, धाटी संस्कृतीप्रेमी, प्रबुद्ध नागरिकांना आवाहन केले की, अशा समाजद्रोही लोकांपासून दूर राहावे, त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, आणि त्यांच्या तांड्यांमध्ये प्रवेश न देता विरोध करावा.
त्याचप्रमाणे भाजप आणि संघ परिवाराच्या कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता त्यांच्याशी संबंध तोडावेत व त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार करावा, असे आवाहनही त्यांनी जाहीरपणे केले.
"गोर बंजारा समाजाला ब्राह्मणीकरण, भगवीकरण, हिंदूकरणाच्या विळख्यातून वाचवणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपली धाटी संस्कृती वाचवण्यासाठी संघटितपणे संघर्ष करावा," असे नम्र आवाहन करत त्यांनी सर्वांना "जय सेवालाल – जय संविधान" असा संदेश दिला.
शंका समाधानासाठी प्रा. ग.ह. राठोड यांच्याशी 9881296967 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी शेवटी सांगितले.



Post a Comment
0 Comments