वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
प्रतिनिधी :- मोहन दिपके
हिंगोली, मौजे दिग्रस कऱ्हाळे
भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे पूर्ण झाली तरी काही खेडेगावांमध्ये सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत. हिंगोली जिल्ह्यातील मौजे दिग्रस कऱ्हाळे हे गाव याचे जिवंत उदाहरण आहे. या गावात आजही बौद्ध समाजाला स्वतःची स्मशानभूमी नाही.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास बौद्ध समाजाच्या त्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या गावात हिंगोली तालुका असो किंवा जिल्हा, अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर मोठे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. तथापि, या समाजाच्या अत्यंत आवश्यक सुविधांकडे सरकारचे लक्ष जात नाही.
दिग्रस कऱ्हाळे हे गाव राज्यातल्या शैक्षणिक दृष्ट्या प्रगत गावांमध्ये गणले जाते. येथे प्राथमिक शाळेला राज्यस्तरीय मान मिळालेला आहे आणि गाव समृद्ध असून सर्व सुखसुविधांनी युक्त आहे. मात्र, या प्रतिष्ठित गावात आजही बौद्ध समाजाला पावसात आपल्या परिजनांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाही.
गावातील बौद्ध समाजासाठी नियोजित स्मशानभूमीच्या शेजारी महादेवाचे मंदिर असून, हिंगोली विधानसभेचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे या मंदिरासाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ शकतात, परंतु बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी सरकारकडून उपलब्ध होत नाही.
आज, दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी, आमचे आजोबा नागोराव गंगाराम कुऱ्हे यांचे निधन झाले. सकाळपासून जोरदार पावसामुळे त्यांच्या अंत्यविधीत अनेक अडचणी आल्या, ज्यांना समाजाने सामोरे जावे लागले. अनेक वर्षे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना अर्ज करून विनंती करूनही बौद्ध समाजाच्या या अत्यावश्यक समस्येकडे सरकारने लक्ष दिलेले नाही.
बौद्ध समाजातील नागरिकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 8 दशकानंतरही त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने जातिवादाची छाया आजही दिसून येते. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जातिवादामुळे एका विशिष्ट घटकाला जीवनातील मूलभूत सुविधा मिळत नाहीत, आणि या समस्येवर योग्य तो तोडगा कधी लागू होईल, हे अद्याप अस्पष्ट आहे.




Post a Comment
0 Comments