Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयटीची स्थापन! तपासात परभणीतील कोणताही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्याचे आदेश!


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

मनोहर गायकवाड

मुंबई : परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना ८ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली आहे.


सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी त्यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते, त्याविरोधात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र, सर्वोच्च न्यायालयात पीडितांच्या बाजूने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. 


ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती, त्यानुसार न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. आगामी काळात ही एसआयटी काय चौकशी करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Post a Comment

0 Comments