वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १३ सप्टेंबर २०२५ – संभाजीनगर शहरात धक्कादायक घटना घडली असून २० वर्षीय तरुणीचा जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मृत्यू झालेली तरुणी प्रियांका अनिल खरात (वय २०) असून ती देवगाव रंगारी येथे राहणाऱ्या पोलीस हवालदार अनिल खरात यांची मुलगी होती. प्रियांका बी-फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणाची तयारी करत होती.
गुरुवारी सायंकाळी प्रियांकाने घरून वडिलांना चहा करून दिला आणि नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करण्यासाठी निघाली. ती जिममध्ये भाऊ यश आणि मैत्रीण प्रणाली कुलकर्णी सोबत होती. काही वेळ व्यायाम केल्यानंतर ती भाऊची वाट बघत असताना अचानक चक्कर येऊन कोसळली. जिममधील सदस्यांनी तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच तिला हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या अचानक घटनेमुळे खरात कुटुंबावर मोठा आघात झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी आणि जिम सदस्यांनी दुःख व्यक्त केले आहे. वैद्यकीय तज्ञांनी तरुणाईत हार्ट अटॅकचे वाढते प्रमाण पाहता नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार, हायड्रेशन आणि व्यायाम करताना पुरेशी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.


Post a Comment
0 Comments