वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मोहन दिपके :
छत्रपती संभाजीनगर – दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता पितळखोरा लेणी, छत्रपती संभाजीनगर येथे एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरज रतन जगताप मार्गदर्शन करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यातील कन्नडजवळ वसलेल्या पितळखोरा लेण्या या भारतातील सर्वात जुन्या बौद्ध लेण्यांपैकी मानल्या जातात. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील ह्या लेण्या हिनयान बौद्ध परंपरेतील असून त्यामध्ये मानवी बुद्धाचे प्रतिनिधित्व नाही. याचबरोबर येथे प्राचीन रेन हार्वेस्टिंग सिस्टम चे अवशेष सापडतात.
या लेण्यांमध्ये यक्ष सैनिक आणि गज लक्ष्मीची जीर्ण शिल्पे आढळतात. पाण्याच्या प्रवाहामुळे या लेण्या दोन भागांत विभागल्या गेल्या आहेत. पितळखोरा लेणी गवताळा अभयारण्यात असल्यामुळे येथे जाण्यासाठी पर्यटकांना अभयारण्यातल्या पायऱ्या उतरून जावे लागते. वेरूळ-अजिंठा लेण्यांपेक्षा या लेण्या अधिक जुना इतिहास सांगतात.
गेल्या अकरा वर्षांपासून हा अभ्यास दौरा सातत्याने आयोजित केला जात आहे. यावर्षीचा दौरा श्री गंगाप्रसाद पाईकराव, कचरू चांभारे, अरुणा इंगळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून सुमारे ३०० हून अधिक अभ्यासक या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
आयोजकांनी जास्तीत जास्त लोकांनी या अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊन पितळखोरा लेण्यांबाबत जागरूकता निर्माण करावी, तसेच लेण्यांच्या संवर्धनाची मागणी अधिक बळकट करावी असे आवाहन केले आहे.



Post a Comment
0 Comments