वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मनोहर गायकवाड
कल्याण (जि. ठाणे) : देशभरासह महाराष्ट्रातही महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या सरकारी घोषणेचा फज्जा उडाल्याचं चित्र दिसत आहे. अशाच प्रकारातील एक भीषण घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीच्या आधारे आठ जणांनी एका तरुणीवर तब्बल पाच महिन्यांपर्यंत वारंवार बलात्कार केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी आपल्या आईसोबत कल्याण परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणीची इंस्टाग्रामवर राहुल भोईर या नराधमाशी ओळख झाली. ही ओळख काही दिवसांतच प्रेमसंबंधात रुपांतरित झाली. याचाच गैरफायदा घेत राहुल भोईर याने एप्रिल महिन्यात पीडितेसोबत संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ त्याने मित्र देवा पाटील याला पाठवला.
देवा पाटील याने पीडितेशी थेट संपर्क साधून तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं आणि तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर हा व्हिडिओ पुढे अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे या मित्रांना पाठवण्यात आला. या सर्व आरोपींनीही तिला ब्लॅकमेल करून शरीरसुखाची मागणी केली आणि तिच्यावर अत्याचार केले. हे सर्व आरोपी मुरबाड व भिवंडी परिसरातील असून त्यांचा कुटुंबीयांचा आर्थिक दर्जा उच्च असल्याचे सांगितले जाते.
या नराधमांनी तब्बल पाच महिन्यांपर्यंत पीडित तरुणीवर अत्याचारांचा कळस केला. यात ती गर्भवती राहिली. मात्र, आरोपींनी तिचा गर्भपात घडवून आणला होता. या सर्व घटनेमुळे पीडितेची मानसिक व शारीरिक अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.
प्रकरण कसं उघडकीस आलं?
आरोपींनी तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे व्हिडिओ पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. धक्कादायक वास्तव समजताच कुटुंबीयांनी पीडितेला घेऊन कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ राहुल भोईर, देवा पाटील, अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे व किरण सुरवसे यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर पोस्को व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
सर्व आठ आरोपींना मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी मोबाईल व गाड्या जप्त करण्यासाठी कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत आरोपींना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment
0 Comments