Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

हिंगोलीत लाचलुचपत प्रकरणात यशस्वी सापळा कारवाई; कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटर रंगेहात पकडला


 

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

मोहन दिपके 

हिंगोली (दि. २३) – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, हिंगोली येथील कंत्राटी इन्चार्ज डेटा एंट्री ऑपरेटर गोविंद संभाजी दहिफळे (वय ३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.


तक्रारदार (वय २९) यांची आई व चुलत मामा हे बांधकाम मजूर म्हणून नोंदणीकृत होते. त्यांच्या मृत्यूनंतर तक्रारदारांनी बांधकाम मजुरांच्या विमा रकमेकरिता अर्ज केला होता. दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी तक्रारदारांनी दहिफळे यांची भेट घेतली असता, त्यांनी “माझी व साहेबांची ओळख आहे, तुझं काम करून देतो, पण तुला ५० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी केली.


तक्रारीची पडताळणी पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत केली असता आरोपीने मागणीची कबुली देत “५० हजार देऊन टाक, उद्या १० हजार दे, उरलेले काम झाल्यावर दे,” असे स्पष्ट केले.


यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हिंगोली युनिटने दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी संजीवनी बालरुग्णालयासमोर, तापडिया इस्टेट, हिंगोली येथे सापळा रचला. आरोपी दहिफळे यांनी तक्रारदारांकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले.


आरोपीकडून मिळालेल्या वस्तू

अंगझडतीत आरोपीकडून रोख २,८६० रुपये, विवो कंपनीचा मोबाईल, पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, दोन सोन्याच्या अंगठ्या, ॲक्सिस बँकेचे एटीएम कार्ड व क्रेडिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपीच्या मूळ राहत्या घराची (चिखली, ता. अहमदपूर, जि. लातूर) घरझडती घेण्यासाठी लातूर विभागाला ठराव पाठविण्यात आला असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.


सदर आरोपीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.


सापळा पथक व अधिकारी

या कारवाईत पोलीस उपअधीक्षक श्री. विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय युनूस शेख, विजय शुक्ला, पो. हवालदार गजानन पवार, भगवान मंडलिक, रवींद्र वरणे, पो. शी. पुंडगे, वाघ, जाधव, चापोह शेख अकबर यांनी सहभाग घेतला.

या कारवाईस पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक कदम यांचे मार्गदर्शन लाभले.



तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क

📞 फोन: ०२४५६-२२३०५५

📞 टोल फ्री क्रमांक: १०६४

📱 व्हॉट्सअॅप: ९३५९१२८८८९ / ९४२२०६१०६४



Post a Comment

0 Comments