वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
ठाणे/शहापूर : मनोहर गायकवाड
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे हे अनेक दिवसांपासून हजारो मराठा बांधवांसह उपोषण करत असून, मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र ही मागणी असंविधानिक असून, राज्य सरकारने दबावाखाली झटक्यात निर्णय घेऊ नये, अशी भूमिका ओबीसी संघर्ष समितीने स्पष्ट केली आहे.
आरक्षण हा संवेदनशील विषय असल्याने निर्णय कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतला जावा, असे मत समितीने मांडले. यापूर्वी खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग तसेच बाठिया आयोग यांनी मराठा समाज मागास नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे शक्य नाही. जर स्वतंत्र आरक्षण देता येणार असेल तर त्यावर सरकारने विचार करावा. परंतु मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न झाला, तर जिल्ह्या जिल्ह्यात तीव्र आंदोलन पेटेल, असा इशारा ओबीसी संघर्ष समितीचे सरचिटणीस प्रमोद जाधव यांनी दिला.
यासंदर्भात शहापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी विनोद भोईर, साधना भेरे, संगीता भेरे, रमेश वनारसे, उपोषणकर्ते भरत निचिते, अप्पुताई खाडे, कुंडलिक पाटील, रवींद्र जाधव, रमेश निचिते, दिनेश गायखे, भरत तरमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments