वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे.
सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने जालना जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके जमिनीत सडली आहेत. कापणीस आलेली पिके, भाजीपाला तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने आत्महत्येचे संकट वाढत चालले आहे.
या आपत्तीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नसून, शेतमजूर, व्यापारी आणि ग्रामीण उद्योग यांनाही मोठा फटका बसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
निवेदनात सरकारकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :
जालना जिल्हा सरसकट ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी.
शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करून कर्जवसुलीला स्थगिती द्यावी.
शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.
या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात, रामप्रसाद थोरात, चोखाजी सौंदर्य, गोवर्धन जाधव, अंबड तालुकाध्यक्ष किशोर तुपे, मंठा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, घनसावंगी तालुकाध्यक्ष समाधान तोडके, बाबासाहेब गालफाडे, नानाभाऊ डोळसे, सुभाष आधुडे, दिलीप मगर, नितीन मगर, अविनाश गाडेकर, संघर्ष पंडित, गौतम भालमोडे, गौतम मगर आदींसह अनेकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


Post a Comment
0 Comments