वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
*मुंबई-* राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. विशेष: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा घातल्याचे चित्र आहे. दिवसागणिक अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे भयावह वास्तव समोर येत आहे. तर या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराज्याला बसला आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली उभे पीक पावसाने अक्षरशः मातीमोल केले आहे. परिणामी शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे आस लावून आहे. अशातच आज देखील पावसाची स्थिती कायम असल्याचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी बीड, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात काल (22 सप्टेंबर) दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने बीड शहरातील बिंदुसरा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान नदीच्या वाढलेली पाणी पातळी पाहता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे. तर अनेक भागात पुरात अडकलेल्या नागरिकांना NDRF च्या मदतीने बाहेर काढण्यास यश आले आहे. तर पूर परिस्थिती पाहता प्रशासनाने शाळा महाविद्यालय सुट्टी जाहीर केली आहे.
जालना जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली, जिथे अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वाघोडा गावात जोरदार पाऊस झाला, तर कल्याणमधील वीजप्रकल्प ओव्हरफ्लो झाला. लातूरमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ज्यामुळे चौदा प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. पुराच्या पाण्यामुळे जनजीवनासोबतच शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या सर्व शाळांना व महाविद्यालयांना आजची सुट्टी जाहीर केली आहे. तसेच वाढत्या पावसामुळे आणि पूर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आवश्यक अशी काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments