वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :
मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच असून सोमवारी सकाळच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत विभागातील तब्बल ७५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून वाहतूक ठप्प झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अतिवृष्टीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर ७६ जनावरे दगावल्याची नोंद झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर असून सुमारे २०० नागरिकांना एनडीआरएफ व लष्कराच्या पथकांनी सुखरूप बाहेर काढले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विभागातील १८ लाख हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नेमका नुकसानीचा आकडा जाहीर होणार आहे.
१५-१६ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या दमदार पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. रविवारी मध्यरात्री पावसाने आणखी कहर केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले.
अतिवृष्टी झालेली प्रमुख मंडळे :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बालानगर, नांदर, बिडकीन, पैठण, पाचोड, विहामांडवा, आपेगाव, गोळेगाव, उंडणगाव येथे अतिवृष्टी नोंदली गेली.
जालना जिल्ह्यातील जालना शहर, शेवली, रामनगर, पचनवडगाव, जामखेड, रोहिलागड, सुखापुरी, बदनापूर, शेलगाव, रोशनगाव येथे मुसळधार पाऊस झाला.
बीड जिल्ह्यातील राजुरी, पेंडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, लिंबागणेश, येळंबघाट, चारठा, परागाव सिरस, पाटोदा, अलमनेर, ढवळावडगाव, धामणगाव, धानोरा, डोईठाण, दादेगाव, गेवराई, धोंडराई, उमापूर, चकलांबा, रेवकी, तलवाडा, धारूर, शिरूर, रायमोह, तींतरवाणी, ब्रम्बनाथ येळंब, गोमलवाडा, खालापुरी या मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठीही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे.


Post a Comment
0 Comments