वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
ठाणे जिल्हा प्रमुख मनोहर गायकवाड
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. न्यायालयातून पसार झालेल्या एका विकृत आरोपीने पुन्हा एकदा एका सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केला. धक्कादायक म्हणजे, या मुलीचा मृतदेह आरोपीने गोणीत भरून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भिवंडी पोलिसांनी अवघ्या पाच तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले.
अधिक माहितीनुसार, दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.५५ ते संध्याकाळी ६.०५ या वेळेत मांगतपाडा, काटगाव, भिवंडी येथे ही घटना घडली. आरोपी सलामतअली आलम अन्सारी याने सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून आपल्या खोलीत नेले आणि तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने मुलीचा गळा आवळून तिचा खून केला. मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता आरोपीचे कृत्य उघड झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले आणि तातडीच्या कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली.
याआधीही आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केला होता. त्या प्रकरणी त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३६३, ३७६ तसेच 'पॉक्सो' कायद्यानुसार कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता, आरोपी न्यायालयाच्या आवारातून गर्दीचा फायदा घेत पसार झाला होता. त्यानंतर बिहारमधील मधेपुर येथून त्याला अटक करण्यात आली होती.
या भयानक घटनेमुळे परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, 'आरोपीला आमच्या समोर फाशी द्या, नाहीतर आमच्या हवाली करा', अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments