वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
पैठण (प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तहसील कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसत असून, निवडणूक वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होत चालले आहे.
तहसील कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, पैठण तालुका गटासाठी एकूण ५९८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर गण विभागासाठी तब्बल १२१६ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. अर्ज नोंदणीचा अंतिम दिवस जवळ आल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला आहे. तहसीलदार कार्यालयात पोलीस कर्मचारी व निवडणूक अधिकारी तैनात करण्यात आले असून, उमेदवारांनी नियमानुसार शांततेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गट व गण विभागातील उमेदवारांची ही मोठी संख्या पाहता, या निवडणुकीत तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. पुढील टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि अधिकृत प्रचार कालावधी जाहीर होणार आहे.
स्थानिक राजकीय समीकरणे लक्षात घेता, पैठण तालुका निवडणुकीत अनेक नवीन चेहरे तसेच जुन्या अनुभवी उमेदवारांमध्ये संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.


Post a Comment
0 Comments