वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
ठाणे जिल्हा प्रतिनिधी : मनोहरजी गायकवाड
चंदीगड : हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) वाय. पूरन कुमार यांनी मंगळवारी चंदीगड येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी सांगितले की, पूरन कुमार यांच्या आत्महत्येमागे कार्यालयातील ताण, प्रशासकीय छळ आणि जातीय भेदभाव असल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमधून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १:३० वाजता त्यांनी घराच्या साउंडप्रूफ तळघरात सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडली. घटनेपूर्वी त्यांनी सुरक्षा रक्षकांना बाहेर जाण्याचे आदेश दिले होते. आत्महत्येच्या वेळी ते रजेवर होते आणि त्यांच्या पत्नी, आयएएस (IAS) अधिकारी अमनीत पी. कुमार, या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर होत्या.
सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप
घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये (८ ते ९ पानांची असल्याचे समजते) पूरन कुमार यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी बेकायदेशीर पदोन्नती, जातीय भेदभाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय छळ यांसारख्या मुद्द्यांवरून वाद असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी अनुसूचित जातीच्या आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध पक्षपाती वागणूक होत असल्याची नाराजी व्यक्त केली आणि याबाबत मुख्यमंत्री व गृह मंत्रालयाला पत्रे लिहून तक्रारी केल्याचेही वृत्त आहे.
चंदीगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) कंवरदीप कौर यांनी सुसाइड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचे सांगितले आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच ती सार्वजनिक केली जाईल, असेही स्पष्ट केले. पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांच्या तक्रारीवरून चंदीगड पोलिसांनी DGP शत्रुजीत कपूर यांच्यासह १३ हून अधिक अधिकारी आणि इतरांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे विधान
घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया ‘एक्स’ (X) हँडलवर ट्विट करत प्रशासकीय व्यवस्थेतील जातीय भेदभावावर तीव्र टीका केली आहे.
आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “दलित आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांची दुःखद आत्महत्या हा स्पष्ट पुरावा आहे की शहरी भागातील जातीय भेदभाव आता ना तर शांत आहे, ना अदृश्य. पूरन यांची पत्नी आयएएस अधिकारी असूनही ते जातीय भेदभावातून वाचू शकले नाहीत.”
यासंदर्भात त्यांनी उच्च पदांवर कार्यरत दलित अधिकारी, प्राध्यापक, अभियंते यांना थेट प्रश्नही उपस्थित केले आहेत:
1. तुम्हाला अजूनही असे वाटते का की आपल्याला आंबेडकरवादी चळवळीची गरज नाही?
2. तुमच्या आर्थिक प्रगतीने तुम्हाला जातीय भेदभावापासून सुरक्षित केले आहे का?
3. तुम्ही अजूनही आंबेडकरवादी पक्षांना दुर्लक्षित करत राहणार का?
प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना आंबेडकरवादी चळवळीशी पुन्हा जोडले जाणे, पत्रकारिता आणि राजकारणात योगदान देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुला-मुलींनाही चळवळीशी जोडण्याचे प्रोत्साहन दिले, अन्यथा त्यांनाही जातीय अन्याय सहन करावा लागू शकतो, अशी गंभीर चेतावनी त्यांनी दिली आहे.


Post a Comment
0 Comments