शहापूर (वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻) –
शहापूर तालुक्यातील बंजारा समाजाला भेडसावणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व रोजगारासंबंधीच्या विविध प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, यासाठी बंजारा बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य संघटन तर्फे दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी शहापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
या निवेदनात बंजारा समाजाच्या मागण्यांचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा, वसतिगृहांची उभारणी, शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याची उपलब्धता यांसाठी शासनाने विशेष पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनातील मुख्य मागण्या :
1. बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक वसतिगृहे उभारावीत.
2. समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांना शासकीय कर्ज, सबसिडी व उद्योजकता विकासासाठी मदत मिळावी.
3. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वह्या-पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य वेळेवर द्यावे.
4. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजना, रोजगार हमी योजना, पीएम/सीएम रोजगार योजना यात समाजातील युवक-युवतींना प्राधान्य द्यावे.
5. आरक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडवून समाजाला न्याय द्यावा.
6. समाजातील गरीब व दुर्बल घटकांना घरकुल योजना, पाणीपुरवठा योजना व इतर मूलभूत सुविधांमध्ये तातडीने मदत करावी.
या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने बंजारा समाजात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मागण्यांची अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली.
निवेदन देताना उपस्थित मान्यवर :
या वेळी बंजारा बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष करणामे लती, प्रफुल्ल लोंढे, कैलास बिराजदार, नारायण शिंदे, अशोक जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.तहसीलदारांनी निवेदन स्विकारून शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आश्वासन दिले.
समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आता लढा आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.


Post a Comment
0 Comments