वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (दि. ८ ऑक्टोबर २०२५) — महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ४ सप्टेंबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार कारखान्यांतील कामगारांच्या दैनंदिन कामाच्या तासांमध्ये वाढ करून ८ ऐवजी १२ तास करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पक्ष प्रमुख लोकनेते राजुभाई साबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या कल्याणाचा विचार करून ८ तास कामाचा नियम राज्यघटनेत दिला होता. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयामुळे या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असून तो घटनाबाह्य आहे. या निर्णयामुळे कामगारांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होणार असून कामगारांच्या आरोग्य, श्रमशक्ती व कुटुंबीयांवर ताण निर्माण होईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
पक्षाच्या मते, १२ तासांचा कामाचा दिवस नियमित स्वरूपात लागू केल्यास कामगारांचे शोषण होण्याची भीती आहे. ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास ओव्हरटाईम देण्याची व्यवस्था रद्द केल्याने अन्यायकारक स्थिती निर्माण होईल. तसेच कामगारांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्याऐवजी थकवा आणि तणावामुळे घट होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने राज्य सरकारकडे या निर्णयाचा तत्काळ पुनर्विचार करून तो रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच कामगारांचा वेळ वाढवण्याऐवजी नवीन रोजगारनिर्मिती करून बेरोजगारांना रोजगाराची संधी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
या निवेदनावेळी पक्ष प्रमुख राजुभाई साबळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, प्रकाश घोरपडे, प्रदीप धनेधर, अनिस गंगापूरकर, अशोक शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments