वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
सोशल मीडिया संपादक मोहनजी दीपके .
वरुड : वरुड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. मोसंबी, संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांच्या यादीत वरुड तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज शेतकरी बांधवांच्या वतीने युवाशक्ती ग्रामविकास संघटना, वरुड तालुका कार्यकारिणी तर्फे तहसीलदार वरुड यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वरुड तालुका पूर्णपणे कृषिप्रधान असून ८५ ते ९० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सततच्या आणि मुसळधार पावसामुळे शेतजमिनींची माती वाहून गेली, नाल्यांमधून शेतात पाणी शिरले, फडगळती व पिकांची पडझड होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
निवेदनात शासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —
वरुड तालुक्याला तातडीने अतिवृष्टीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करावे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
शेतकऱ्यांना बियाणे, खत, वीजबिल सवलत यासह सर्व शासकीय सवलती द्याव्यात.
मोर्शी मतदारसंघातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडे सत्तेचा मोठा भाग असतानाही वरुड तालुका यादीतून वगळला गेला, ही गोष्ट अत्यंत खेदजनक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या भागात नुकसान झाले नाही त्या भागांना अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्यात आले, तर वरुड तालुक्याशी अन्याय झाला असल्याचे निवेदनात नमूद आहे.
शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर युवाशक्ती ग्रामविकास संघटना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित होते — युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे वरुड तालुकाध्यक्ष श्री. पवन ठाकरे, तालुका उपाध्यक्ष श्री. पलाश वानखडे, तालुका सचिव श्री. राजेश धोटे, शेतकरी नेते श्री. सुशिलभाऊ बेले, श्री. अनिलभाऊ वाडिवे, सोळंकी सर, तसेच वरुड तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी श्री. कैलास चरपे आणि रितू फुलेकर.


Post a Comment
0 Comments