वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज छत्रपती संभाजीनगर पोलिस प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम देत सोशल मीडियावर आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात प्रसारित झालेल्या मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधी मंडळाने कार्यवाहक पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांची भेट घेतली. या भेटीत संबंधित व्हिडिओ तयार करणारे आणि प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पोलिस प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची मागणी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, जर २४ तासांच्या आत योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने व रस्ते बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात मतभेद निर्माण करण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील वातावरणात काही प्रमाणात तणाव असला तरी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या या इशाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments