Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

‘ *बाल विवाह मुक्त महाराष्ट्र’–आपला संकल्प अभियानाअंतर्गत कनेरगाव नाका येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न*

 


 वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

मोहन दिपके

हिंगोली महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘बाल विवाह मुक्त महाराष्ट्र – आपला संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून हिंगोली तालुक्यातील मौजे कनेरगाव (नाका) येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, हिंगोली व इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेरनेस अ‍ॅण्ड रिफॉर्म (आयएसएआर) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006, पोक्सो कायदा तसेच बाल संरक्षण प्रणाली विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.



या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणांची रचना, बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळाची कार्यप्रणाली याबाबत माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील तरतुदी, अल्पवयीन विवाह हा दंडनीय गुन्हा असून त्यासाठी एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांपर्यंतच्या सक्त मजुरीची शिक्षा असल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण व शहरी भागातील बाल विवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली.

कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी बालकांचे अधिकार व संरक्षणासंबंधी कायद्यांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांकडून बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करवून घेतले. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. आयएसएआर संस्थेच्या प्रकल्प समन्वयक अनिता भगत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर जिल्हा समन्वयक देविदास खरात यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मनोहर, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. कार्यक्रमादरम्यान बाल विवाह प्रतिबंध, बाल अधिकार संरक्षण व कायदेशीर उपाययोजनांविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.

बाल विवाह प्रतिबंधासाठी तात्काळ मदत किंवा माहितीकरिता चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन 112 टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले .



Post a Comment

0 Comments