Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त हिंगोलीत जनजागृती उपक्रमांना सुरुवात

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

सोशल मीडिया संपादक मोहन दिपके

हिंगोली : आंतरराष्ट्रीय दत्तक महिना (नोव्हेंबर) निमित्त हिंगोली जिल्ह्यात “विशेष गरजा असलेल्या मुलांचे संस्थाबाह्य पुनर्वसन” या प्रमुख थीमअंतर्गत व्यापक जनजागृती उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. आर. दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या नियोजनानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन करण्यात आला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृह वॉर्ड तसेच पोषण पुनर्वसन केंद्रात (0 ते 5 वर्षे बालक) दत्तक प्रक्रियेबाबत माहितीपत्रके, पोस्टर्स व बॅनर्सद्वारे जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम व आहारतज्ञ श्रीमती सुप्रिया इंगोले यांचे सहकार्य लाभले.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांची भेट घेऊन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातही जागृती साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच हिंगोली रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टर राजकुमार, रेल्वे पोलीस कर्मचारी चांदु खंदारे आणि पॉइंट मॅन सोपान गांजरे यांच्या उपस्थितीत दत्तक प्रक्रियेवरील कायदेशीर माहिती पत्रकांचे प्रदर्शन करण्यात आले.



नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा केला जात असून, या कालावधीत बालकांचे हक्क, सुरक्षा, पुनर्वसन आणि दत्तक प्रक्रियेवरील विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 यांच्या वतीने करण्यात येत आहे. कोणतेही बालक परस्पर किंवा अनौपचारिकरित्या दत्तक घेणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


विधिसंमत दत्तक प्रक्रियेसाठी इच्छुक पालकांनी www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक अंकुर पाटोडे, राजरत्न पाईकराव व तथागत इंगळे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments